माधव गडकरी - परिचय

एक झुंझार पत्रकार, सिद्धहस्त लेखक आणि फर्डे वक्ते म्हणून माधव गडकरी यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो.   गडकरी  घराणे मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाडचे. कौटुंबिक कारणांमुळे त्यांचे आजोबा सीताराम हे निफाड सोडून मुंबईला आले ( त्यांच्या आजीचे त्याआधीच निधन झाले होते ). ह्यावेळी माधवरावांचे वडील यशवंत हे सहा - सात वर्षांचे होते. ते, त्यांचे दोन भाऊ "तीन भावंडे आणि आजोबा यांनी सुरवातीचे दिवस अतिशय कष्टात काढले", असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्याच्या वडिलांचे (यशवंत) शिक्षण बेताचेच असले तरी त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळाली ती त्यांनी ३० वर्षे केली.       

माधवरावांचा जन्म  २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला . १९३२ मध्ये त्यांच्या आईच्या वडीलांच्या ( नामवंत चित्रकार  ल.ना.तासकर ) सल्ल्यावरून वडिलांनी बिऱ्हाड ठाण्याला हलवले .  ठाण्यालाच माधवरावांचे आठवी पर्यंतचे शिक्षण झाले- ४ थी पर्यंत ठाणे नगरपालिकेच्या शाळेत आणि ५ ते ८ वी पर्यंत नौपाडा मिडल स्कूल मध्ये नंतर मॅट्रिक पर्यंतचे त्यांचे शिक्षण दादर च्या किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये ( आताचे राजा शिवाजी विद्यालय ) झाले.  त्यानंतर ते माटुंग्याच्या राम नारायण रुईया महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन बी .ए. (ऑनर्स )झाले. शाळेतील मुख्याध्यापक पाठक गुरुजी आणि महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक न.र.फाटक यांना गडकरी गुरुस्थानी मानीत .

  माधवरावांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. त्यांच्या वडिलानी त्यांना याबाबतीत प्रोत्साहन दिले. त्यांच्या आईलाही वाचनाचा नाद होता.  याशिवाय माधवरावांवर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झाले.त्यांच्या पुढील आयुष्यात  राष्ट्रसेवा दलाची शिकवण मार्गदर्शक ठरली."राष्ट्रसेवा दलाने त्या काळात देशाभिमान, धर्मातीतता आणि लोकशाही यांचे बीजारोपण केले", असे त्यांनी म्हटले आहे . दत्ता ताम्हणे यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.  साने गुरुजी, वि. स . खांडेकर, अच्युतराव पटवर्धन,  एस. एम. जोशी हे त्यांचे आदर्श होते. ८ ऑगस्ट १९४२ च्या रात्री मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी "चले जाव " ची घोषणा देऊन जे प्रसिद्ध भाषण केले, त्याला माधवराव हजर होते.त्यावेळी त्यांचे वय १४ वर्षे होते.तेव्हापासून पुढे "प्रत्यक्ष स्वात्रंत्र्यलढ्यात नव्हतो तरी त्या वातावरणात सतत वावरत होतो " असे त्यांनी सांगितले आहे . याच काळात त्यांचे वृत्तपत्र वाचन सुरु झाले.  'लोकमान्य' हे त्यांचे आवडते दैनिक होते.  

 माधवरावांच्या पत्रकारितेची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनातच झाली.  अगदी नौपाडा मिडल स्कूलमध्ये आठवीत असताना त्यांनी 'कल्पकथा' नावाच्या हस्तलिखित मासिकाचे "संघटन - संपादन" केले  होते.त्यानंतर त्यांनी 'निर्झर ' हे मासिक आधी हस्तलिखित आणि नंतर छापील स्वरूपात चालविले. त्याची सुरवात ५ नोव्हेंबर १९४५ रोजी झाली. पाच-सहा अंक निघून ते बंद झाले. माधवरावांच्या वडिलांनी पोर्ट ट्रस्ट मधून निवृत्त  झाल्यावर स्वतःचा छापखाना काढला होता. तेथेच छपाई होत असे. त्यानंतर 'क्षितिज' मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे मासिक तीन वर्षे चालले. त्यात अनेक नामवंत लेखकांनी लेखन केले. त्यानंतर गडकरी यांच्या संपाद्कत्त्वाखाली  'निर्धार' हे साप्ताहिक सुरु झाले. तेही जानेवारी १९५३ ते १९५५ अखेर , असे जवळजवळ तीन वर्षें चालले. तथापि तो काळ त्याने गाजविला. 'ठाणे  जिल्ह्याचे अभिनव साप्ताहिक ' असे त्यास म्हटले जाई."माझ्या नंतरच्या सर्व पत्रकारितेच्या कामाची बीजे या 'निर्धार' ने पेरली.

लोकाभिमुख पत्रकारिताही 'निर्धार' ने मला शिकविली", असे माधवरावांनी सांगितले आहे. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनशैलीचा पाया 'निर्धार' ने घातला. तो काळ भाषावार राज्य पुनर्रचनेचा होता. त्यासाठी न्या. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगा समोर  कैफियत मांडण्यासाठी एक 'ठाणे जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समिती 'स्थापन झाली होती. 'निर्धार ' हे तिचे मुखपत्र होते. याशिवाय, ठाणे जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर 'निर्धार' ने सातत्याने लिहिले परंतु वडीलांनी घर व छापखाना विकल्यामुळे माधवरावांनी 'निर्धार' बंद करण्याचा निर्णय घेतला. 

१ एप्रिल १९५६ रोजी माधव गडकरी दिल्लीला आकाशवाणीच्या मुख्यालयात संदर्भ व संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाले. तेव्हाचे माहिती व प्रसारण सचिव श्री. पु. मं. लाड यांनी गडकरींची निवड केली होती.  एप्रिल १९६२ पर्यंत म्हणजे सहा वर्षे ते दिल्लीत होते.  आकाशवाणीतील त्यांच्या कामाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. मात्र दिल्लीतील वास्तव्यात त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या, असंख्य माणसे भेटली, तऱ्हेतऱ्हेचे अनुभव आले. 'निर्धार ते लोकसत्ता' या आपल्या पुस्तकात दिल्लीतील विविध अनुभवांचे, प्रसंगांचे व माणसांचे अतिशय रंगतदार वर्णन त्यांनी केले आहे आणि " ...दिल्लीने मला घडवले " असे म्हटले आहे.  

माधवरांच्या दिल्लीतील वास्तव काळातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे त्यांच्या पुढाकाराने तेथे भरलेले मराठी नाट्यसंमेलन.  एखाद्या संस्थेच्या स्थापनेत किंवा समारंभाच्या, संमेलनाच्या, उपक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेण्याची माधवरावांना हौस असे.  ते त्यांचे एक स्वभाववैशिट्यच होते.  ते दिल्लीमध्ये असताना व्दा . भ. कर्णिक, विश्वनाथ नेसरीकर आणि माधवराव, यांनी मिळून दिल्लीत मराठी नाट्यपरिषदेची शाखा स्थापन केली आणि नंतर १९६१ मध्ये परिषदेचे ४३ वे अधिवेशन - म्हणजेच ४३ वे मराठी नाट्यसंमेलन - दिल्लीत आयोजित केले " ...मराठी माणसे ठरवीत नाहीत असे भव्य -दिव्य असे काहीतरी योजिण्याचे आम्ही ठरविले" असे माधवरानी त्याबद्दल म्हटले आहे .  त्याप्रमाणेच विज्ञान भवन येथे हे भव्य दिव्य संमेलन पार पडले.  त्याच्या अध्यक्षस्थानी  श्रीमती दुर्गाबाई खोटे होत्या. स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण होते.स्थानिक स्वागतमंडळाचे अध्यक्ष त्यावेळी सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश असलेले (आणि नंतर सरन्यायाधीश झालेले )  न्यायमूर्ती प्र . बा. गजेन्द्रगडकर होते. संमेलनाचे उदघाटन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केले. श्री.  पु. ल . देशपांडे यांचे महत्वाचे भाषण झाले. संध्याकाळी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास आणि 'पंडितराज जगन्नाथ' नाटकाच्या प्रयोगास पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी काकासाहेब गाडगीळ आणि बापूजी अणे उपस्थित होते. मराठी नाट्यसंमेलनांच्या इतिहासात दिल्लीतील हे संमेलन एक मैलाचा दगड ठरले. 

१९६२ च्या सुरवातीस 'टाइम्स ऑफ इंडिया ' समूहाने मराठी वृत्तपत्र काढण्याचे ठरविले. मराठी टाइम्स चे पहिले संपादक म्हणून व्दा .भ. कर्णिक यांची नियुक्ती झाली. त्यांनी माधव गडकरी  यांची निवड मुख्य उपसंपादक म्हणून केली. आपल्या पुस्तकात गडकरी म्हणतात ही  मूळ योजना २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्र टाइम्स सुरु करण्याची होती. परंतु वृत्तपत्रीय कागदाबद्दलच्या अडचणीमुळे तसे होऊ शकले नाही आणि महाराष्ट्र टाइम्स चा पहिला अंक त्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी , म्हणजे १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला. त्या दिवसापासून सुमारे ५ वर्षं गडकरी महाराष्ट्र टाइम्स मध्ये होते. त्याकाळाला त्यांनी " 'महाराष्ट्र टाइम्स ' चे पहाटेचे दिवस " म्हटले आहे.   

आधी मासिक आणि साप्ताहिकात काम केल्यानंतर आणि त्यानंतर सुमारे सहा वर्षे दिल्लीत वृत्तपत्र क्षेत्राच्या बाहेर राहिल्यानंतर कर्णिकांनी आपल्याला वृतपत्र क्षेत्रात परत आणले असे गडकरी यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम करतानाच्या विविध आठवणी त्यांनी सविस्तर सांगितल्या आहेत.  तेथे असतानाच त्यांना थॉमस फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली(ही निवड प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर्फे होत असे ) आणि पत्रकारितेचा विशेष अभ्यास करण्यासाठी ते ब्रिटनला गेले.  तेथे त्यांचे वास्तव्य वेल्स ची राजधानी कार्डिफ येथे होते.  ब्रिटनमधून  ते रविवार महाराष्ट्र टाइम्ससाठी 'पश्चिम क्षितिजावर'यासदरात वार्तापत्र लिहीत असत.  तेथून परत येताना ते युरोप ला तसेच मास्कोला भेट देऊन आले त्यावरही त्यांनी लेख लिहिले.  त्या सर्व लेखांचे पुस्तक 'मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन ' या नावाने प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्र टाइम्स मध्ये गडकरी 'असा हा महाराष्ट्र ' हे साप्ताहिक सदर लिहीत असत ते दर सोमवारी प्रसिद्ध होत असे. १९६३ ते १९६६ अशी साधारण तीन - साडे तीन वर्षे ते सादर चालले होते त्यासाठी माधवरावांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला "हे सदर एक प्रवासाचं होता ", असे त्याबद्दल त्यांनीच लिहिले आहे.  पुन्हा त्यांच्याच शब्दात, या लेखांच्या माध्यमातून " महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दर्शन " त्यांनी स्वतः ही  नव्याने घेतले आणि वाचकांनाही घडविले . त्यातील निवडक लेखाचे 'असा हा महाराष्ट्र ' हे द्विखंडात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले.  पाहिला खंड १९६५ मध्ये प्रकाशित झाला त्यांला बॅ. नाथ पै यांची प्रस्तावना होती.  दुसरा खंड  १९६६ मध्ये प्रकाशित झाला त्याला पु. ल . देशपांडे यांची प्रस्तावना होती.  पहिल्या खंडात स्थळे, घटना आणि प्रसंग घेतले होते तर दुसऱ्या खंडात व्यक्तिचित्रे घेतली होती. या खंडाची दुसरी आवृत्ती १९८८ मध्ये प्रकाशित झाली, तर दोन्ही खंड एकत्र करून फेररचना करून केलेली तिसरी आवृत्ती २००५ मध्ये प्रकाशित झाली.  तिच्यात पु.लं ची प्रस्तावना घेतली आहे.  याव्यतिरिक्त माधवरावांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये 'चित्रसेन' या टोपण नावाने 'वक्ती आणि महती' हे सदरही काही महिने लिहिले.  रविवार महाराष्ट्र टाइम्स चे काही अग्रलेख ही त्यांनी लिहिले. 

महाराष्ट्र टाइम्समध्ये ५ वर्षे राहिल्यानंतर १ जून १९६७ रोजी माधव गडकरी गोव्याच्या 'दैनिक गोमंतक' चे संपादक झाले.  १३ नोव्हेंबर १९७६ पर्यंत ते गोव्यात होते.  या काळात त्यांनी "गोमंतक स्थिर पायावर उभा करण्याचा प्रयंत्न केला ". त्यांच्या काळात 'गोमंतक' चा खप वाढला नवीन इमारत उभी झाली, नवीन यंत्रसामग्री आली , कुडाळहून कोकण आवृत्ती निघू लागली.  दैनिक गोमंतक - आणि रविवार गोमंतक - हे एक मराठी वृत्तपत्र म्हणून प्रस्थापित झाले.

'रविवारचा दृष्टीक्षेप' हे एक महत्वाचे सदर माधवरावांनी 'रविवार गोमंतक' मध्ये १९६७ मध्ये सुरु केले . ते पुढे 'मुंबई सकाळ ' आणि 'लोकसत्ता' मधेही चालू ठेवले. या सदरातील लेखात आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रातील विषयांना ते स्पर्श करीत. (यांपैकी 'रविवार गोमंतक ' मध्ये लिहिलेल्या लेखांची एकूण संख्या ३२० आहे.)  यातील निवडक लेख 'दृष्टीक्षेप' च्या तीन खंडात प्रसिध्द झाले. 

 गोव्यात असतानाही गडकरींची प्रत्यक्ष गोव्यात त्याच प्रमाणे देश -विदेशात भ्रमंती चालूच असे.  गोव्यातील भ्रमंतीत, गोव्याचा इतिहास, लॅटिन संस्कृतीची छाया असलेले समाजजीवन, निसर्ग सौंदर्य, हिंदू मंदिरे, ख्रिश्चनांची चर्चेस, काही महत्वाच्या व्यक्ती अशा विविध गोष्टींचा वेध घेतला आणि त्यावर 'असा हा गोमंतक' या सदरात लेख लिहिले.  ' असा हा महाराष्ट्र 'च्याच धर्तीवर त्यांचे पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. १९८८ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली.

 गोव्यात असताना माधवरावांनी पहिला परदेश - दौरा केला तो बांगलादेश चा.  १६ डिसेंबर १९७१ रोजी जनरल नियाझीने शरणागती पत्करली आणि बांग्लादेश मुक्त झाला . त्यानानंतर लगेच, म्हणजे १ जानेवारी १९७२ रोजी गडकरी आपल्या दोन सहकाऱ्यांसह बांग्लादेशात  पोहोचले. कोलकोत्ताहून आधी मोटार आणि नंतर बोट यांचा उपयोग करून ते ढाक्यास पोहोचले. मोटरनेच बांगलादेश फिरले. शेख मुजीबुर रेहमान हे तेव्हा पाकिस्तानात तुरुंगात होते. पण त्यांच्या पत्नीला गडकरी भेटू शकले. तेथून परतल्यावर त्यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी 'गोमंतक' चा प्रजासत्ताकदिनाचा  अंक  बांगलादेश विशेषांक म्हणून काढला. त्यांच्याबरोबर गेलेल्या  श्री. अंबाजी कामत या छायाचित्रकारानी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पणजीत भरविले. नंतर या दौऱ्याचा वृत्तांत कथन करणारे 'सोनार बांगला' हे पुस्तक माधवरावांनी लिहिले. त्यास गोवा काळ अकादमीचा पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार हे दोन्हीं पुरस्कार मिळाले. 

गोव्यामध्ये असतानाच गडकरी यांनी अमेरिकेचा पहिला दौरा केला. न्यूयॉर्क राज्यातील ब्रॉकपोर्ट येथील न्यूयॉर्क राज्यपीठातील एका परिसंवादात भाग घेण्यासाठी त्यांना निमंत्रण मिळाल्याने ते दैनिक गोमंतक तर्फे त्यासाठी गेले. त्याचवेळी १९७२ च्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूमही सुरु होती. त्यासर्व वातावरणाचे अवलोकन त्यांनी केले. वॉशिंग्टन येथील इंटरनॅशनल सेंटर मध्ये ' निवडणूका ' याच विषयावर दोन दिवसांचे एक चर्चा सत्र होते, त्यातही भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. नेमक्या याच दिवसात वॉटर गेट  प्रकरण बाहेर आले त्याबद्दल गडकरी लिहितात, "ज्या दिवशी हे वृत्त 'वॉशिंग्टन पोस्ट' नी दिले त्यादिवशी मी त्या शहरात होतो. परंतु त्याचे गांभीर्य तेव्हा मला कळले नाही. गोव्यात परत आलो आणि वॉटर गेट चे पाणी धरण फुटल्यासारखे वाहू लागले... एका संपन्न राष्ट्राच्या बलाढ्य अध्यक्षाचा वृत्तपत्रांनी संपूर्ण पाडाव केला होता". या अमेरिका दौऱ्यावर आणि वॉटर गेट प्रकरणावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली , लेख लिहिले, परंतु पुस्तक मात्र लिहिले नाही.  

 नंतर १९७५ मध्ये माधवरावांनी जपानचा दौरा केला. त्यावर्षी श्री.विश्वासराव चौगुले यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त एक गौरव - ग्रंथ काढण्याचे ठरले.  त्यानिमित्त ,"कोणीतरी जपानला जाऊन विश्वासराव चौगुले यांनी आपल्या वयाच्या (३४-३५ व्या) वर्षी लोहखनिज निर्यातीसाठी जपानला जाऊन पहिला करार केला आणि त्यामधून गोवा - जपान निर्यात व्यवहाराची मुहूर्तमेढ रोवली (गेली). "त्याचा इतिहास लिहावयाचा होता.  ते काम माधवरावांकडे आले आणि त्यासाठी ते जपानला गेले.  तेथे त्यांनी जपानचे सम्यक दर्शन घेतले.  पोलाद निर्मिती प्रकल्प, जपानचे निसर्ग सौदर्य सर्वकाही पहिले. 'आसा ही शिंबून' या प्रचंड खपाच्या जपानी वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले येताना ते हॉंगकॉंग व बँकॉकलाही जाऊन आले या सर्व प्रवासावर त्यांनी लेख लिहिले आणि नंतर त्याचे ' एक झलक पूर्वेची' हे पुस्तक आले. 

भारतात आणीबाणी पुकारली गेल्याचे वृत्त गडकरींना टोकियो येथे समजले.  तेथून परतल्यावर त्यांची सत्वपरीक्षा सुरु झाली.  वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली होती.  परंतु "एक दिवसही आमच्या अंकाची पाने सेन्सॉरकडे छपाई पूर्वी तपासणीसाठी दिली नाहीत", असे त्यांनी सांगितले आहे.  थेट दिल्लीहून त्यांना धमक्या येत परंतु तरीही ते निर्भयपणे सडेतोड अग्रलेख लिहीत राहिले.  आणीबाणी व्यतिरिक्तही 'गोमंतक' ने अनेक विषयांवर सडेतोड भूमिका घेतल्या.  गडकरी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री श्री.दयानंद बांदोडकर यांच्यात कित्येक विषयांवर गंभीर मतभेद झाले,  त्यावरून वाद झाले.  त्यावर माधवरावांनी 'सत्ता आणि लेखणी' हे छोटे पुस्तकही प्रसिद्ध केले.  

आपल्या 'निर्धार ते लोकसत्ता' या पुस्तकात गडकरी यांनी आपल्या गोव्यातील वास्तव्यावर ४ प्रकरणे लिहिली आहेत. त्यात त्यांनीच म्हटल्याप्रमाणे " जवळजवळ १० वर्षांचा एक समृद्ध कालखंड " त्यांनी गोव्यात अनुभवला. ' गोमंतक' च्या कामाव्यतिरिक्त विविध संस्थांची कामे, विविध विषयांवरील परिसंवाद आणि भाषणे, मुंबईहून येणाऱ्या साहित्यिकांचे दौरे, परदेशी पाहुण्यांच्या भेटी, राजकीय-सामाजिक प्रश्न, मराठी-कोकणी वाद इत्यादी अनेक विषयांची चर्चा त्यांनी केली आहे. मनोरंजक किस्से सांगितले आहेत.  त्यांच्या खास शैलीतील हा सगळा वृत्तांत अत्यंत वाचनीय आहे. 

१५ नोव्हेंबर १९७६ रोजी गडकरी 'मुंबई सकाळ' मध्ये स्थानीय संपादक म्हणून रुजू झाले.  'मुंबई सकाळ' चा खप वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' शी त्यांची स्पर्धा होती.  रुजू झाल्यावर चारच दिवसांनी म्हणजे १९ नोव्हेंबर १९७६ पासून त्यांनी 'चौफेर' हे दैनिक सदर चालू केले.  या सदरात, त्यांच्या शब्दात " एकीकडे समाज - प्रबोधन, दुसरीकडे विचार-मंथन असा एक धागा " त्यांनी सतत जपला.  कोणताही विषय त्यांना वर्ज नव्हता . त्याबद्दल त्यांनी 'निर्धार ते लोकसत्ता ' सविस्तरपणे लिहिले आहे.  हे विषय त्यांना कसे मिळत याबद्दल त्यांनी सांगितलेले अनुभव व किस्से मनोरंजनक व उदबोधक आहेत. 

 गडकरी यांच्या 'लोकाभिमुख पत्रकारिते' चा पाया 'निर्धार' मधेच घातला गेला होता याचा उल्लेख वर आला आहेच.  तो उपक्रम त्यांनी 'गोमंतक' मध्ये पुढे चालविला  'मुंबई सकाळ' मध्ये तो आणखी उंचीवर नेला. 'चौफेर' हे सदरच या उपक्रमाचे साधन किंवा माध्यम झाले . पुन्हा त्यांच्याच शब्दात "चौफेर केवळ शब्दांचा अगर टीकाटिपणीचा भाग राहिला नाही ती एक चळवळ झाली ".'चौफेर' च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील जोडरस्ते, कोकणातील पूरग्रस्तांना सहाय्य , रस्त्यावर बसणाऱ्या गटई कामगारांना परवाने मिळवून देणे अशी कितीतरी कामे उभी झाली.  याशिवाय ही  अनेक गोष्टी माधवरावांच्या नेतृत्वाखाली 'मुंबई सकाळ' ने धसास लावल्या. वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे यांचा पुतळा हे त्यापैकी एक उल्लेखनीय उदाहरण होय .                                      

१९८० मधल्या  विधानसभा निवडणुकांनंतर  श्री.अ .र.अंतुले  हे  ९ जून १९८० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तीन महिन्यातच सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त प्रकरणांत  'मुंबई सकाळ ' ने घेतलेल्या भूमिकेमुळे आणि गडकरी यांच्या लेखांमुळे व अग्रलेखांमुळे गडकरी-अंतुले वादाला तोंड लागले. त्यात शेवटी अंतुल्यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर सिमेंट भ्रष्टाचार आणि  'इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान' याप्रकरणी ही 'मुंबई सकाळ ' व माधवराव यांनी खंबीर भूमिका घेतली. ह्या विषयावर गडकरी यांनी ' भ्रष्टाचार्य अंतुले' हे पुस्तक प्रकाशित केलें.  'मुंबई सकाळ 'वर मोर्चे आले, त्याचा टेम्पो जाळला गेला. गडकरी यांच्यावर विधानसभेत हक्कभंग ठराव आणला गेला. शेवटी लेंटिन आयोगाच्या अहवालानंतर अंतुले यांनी जानेवारी १९८२ मध्ये राजीनामा दिला. 

अंतुले यांच्या काळात महाराष्ट्र राज्य पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत आणि अकोला साहित्यसंमेलनाच्या वेळी प्रत्यक्ष संमेलनातही त्यांनी व्यक्तिशः हस्तक्षेप केला. ह्या सरकारी हस्तक्षेपास विरोध करण्यासाठी १९ आणि २० डिसेम्बर १९८१ रोजी मुंबईत एक 'समांतर साहित्य संमेलन' भरले. त्याच्या आयोजनात 'मुंबई सकाळ ' आणि व्यक्तिशः माधवरावाचा पुढाकार होता. सरकार /मंत्री  आणि साहित्यिक यांचे परस्पर संबंध , साहित्यिकांचे स्वातंत्र्य, वगैरे अनेक विषयांवर ह्या संमेलनात चर्चा झाली.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मालतीबाई बेडेकर होत्या. " त्यांचे उभे राहणे , बोलणे हे सारे स्फुर्तिदायक होते ... समांतर साहित्यसंमेलन म्हणजे स्वातंत्र्य व स्वाभिमान यांचा एक अविष्कार होता " असे गडकरी यांनी म्हटले आहे. अशा अनेक गोष्टींमुळे त्यांची 'मुंबई सकाळ' मधली आठ वर्षांची कारकीर्द गाजत राहिली. १९८४ मध्ये त्यांनी 'मुंबई सकाळ' सोडला. त्याची कारणमीमांसा त्यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.   

२ एप्रिल  १९८४ रोजी माधव गडकरी 'लोकसत्ता' चे संपादक म्हणून रुजू झाले. २४ सप्टेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षे ते संपादकपदी होते. ह्या कारकीर्दीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढविला. ह्याही काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय हाताळले, त्यांना तोंड फोडले, सार्वजनिक हितासाठी वाद ओढवून घेतले, त्यातून त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या बेअदबीचे दोन खटले झाले, ते त्यांनी जिद्दीने लढविले, हा सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या पुस्तकात तपशिलाने कथन केला आहे.

गडकरी संपादकपदावर असतानाच २८ सप्टेंबर १९८८ रोजी 'लोकसत्ता' ची पुणे आवृत्ती सुरु झाली, त्याचप्रमाणे ६ एप्रिल १९९२ रोजी नागपूर आवृत्ती सुरु झाली.(यथावकाश अहमदनगर, औरंगाबाद आणि दिल्ली आवृत्त्याही सुरु झाल्या .) याशिवाय निवृत्तीपूर्वी काही काळ गडकरी 'लोकसत्ता ' बरोबरच साप्ताहिक 'लोकप्रभा' चेही संपादक होते.

'मुंबई सकाळ' मधले 'चौफेर' हे सदर माधवरावांनी सुमारे वर्षभराच्या खंडानंतर  म्हणजे मार्च १९८५ मध्ये 'लोकसत्ता' मध्ये पुन्हा चालू केले. 'लोकसत्ता' मधून निवृत्त झाल्यानंतरही हे सदर त्यांनी काही वर्षें चालू ठेवले होते. त्यातील निवडक लेखांचे एकूण सहा खंड १९८२ ते २००० या कालावधीत प्रसिद्ध झाले. ह्याव्यतिरिक्त नंतरच्या काळात ते साताऱ्याच्या 'ऐक्य' ह्या वृत्तपत्रात 'गुलमोहराची पाने ' हे सदर लिहीत असत. त्यातील निवडक लेखांचे 'गुलमोहराची पाने ' ह्याच शीर्षकाचे पुस्तक १९९९ मध्ये प्रसिद्ध झाले. 

 माधवरावांचा जन्म १९२८ सालचा. १९८६ मध्ये त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण झाली आणि १९८८ मध्ये ६०. ह्या दोन्ही प्रसंगी त्यांच्या मित्रांनी, चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी मुंबईत त्यांचे अतिशय हृद्य सत्कार केले. यांपैकी पहिल्याच्या मुख्य पाहुण्या  श्रीमती  लता मंगेशकर होत्या. कार्यक्रमास  श्री.शरद पवार, श्री.वसंत कानेटकर, श्री. सुशीलकुमार शिंदे, श्री.सुधीर फडके, श्री.गजानन जागिरदार अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. ह्या प्रसंगी माधवरावांना एक मारुती कार भेट देण्यात आली. नंतर १९८८ मध्ये माधवरावांची षष्ट्यब्दीपूर्ती ही अशाच सत्काराने साजरी झाली. त्यावेळी तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशास्त्री जोशी हे प्रमुख पाहुणे होते तर समारंभास श्री. एस.एम. जोशी , श्री.नानासाहेब गोरे, श्री. वसंत कानेटकर, मुख्यमंत्री श्री.शरद पवार, श्री. व्दा. भ. कर्णिक, श्री. नारायण आठवले अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

गडकरी 'लोकसत्ता' चे संपादक असताना त्यांनी पुढाकार घेऊन दोन महत्वाचे उपक्रम यशस्वी केले.  त्यांतील पहिला म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या 'सामाजिक परिषद' या संस्थेचे पुनरुज्जीवन आणि दुसरा म्हणजे जागतिक मराठी परिषदेची स्थापना आणि तिची पहिली दोन अधिवेशनें .

 सामाजिक परिषदेची स्थापना न्या. रानडे यांनी १८८७ मध्ये केली होती.१८९५ पर्यंत सामाजिक परिषदेची अधिवेशनें काँग्रेसच्या अधिवेशनांसोबतच, त्याच मंडपात भरत असत. राजकीय सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.  हा  न्या. रानडे यांचा विचार त्यामागे होता.  ही राष्ट्रीय सामाजिक परिषद असे.  त्याशिवाय प्रांतिक सामाजिक परिषदही भरत असे. न्या. रानडे सर्वत्र उपस्थित असत. १८९५ पासून सामाजिक परिषदेची अधिवेशने स्वतंत्रपणे भरू लागली.  मात्र स्वातंत्रोत्तर काळात त्यात खंड पडला. १९५३ मध्ये पुण्याला न्या. प्र. बा. गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली, त्यानंतर १९६० मध्ये नागपूरला न्या. भवानीशंकर नियोगी आणि १९६२ मध्ये औरंगाबादला डॉ. सुमंत मुरंजन यांच्या अध्यक्षतेखाली, अशी सामाजिक परिषदेची फक्त तीन अधिवेशने भरली. 

 १९८७ हे सामाजिक परिषदेचे शताब्दीवर्ष असल्याने, त्या वर्षी सामाजिक परिषदेचे पुनरुज्जीवन करावे असे माधवरावांनी ठरवले आणि 'लोकसत्ता' मधून त्याबद्दलची भूमिका मांडली.  त्यांना प्राचार्य त्र्यं. कृ. टोपे त्यांची साथ लाभली.  सामाजिक परिषदेचा हा शताब्दी उत्सव २८ व २९ नोव्हेंबर १९८७ रोजी निफाड  ह्या न्या. रानड्यांच्या जन्मगावी साजरा झाला.  निफाड हे माधव गडकरी यांचेही गाव असल्याने दुहेरी औचित्य साधले गेले.  ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी न्या. सुजाता मनोहर होत्या. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री.भालचंद्र उदगावकर हे उद्घाटक होते, तर कवी कुसुमाग्रज हे स्वागताध्यक्ष होते. हे शताब्दी अधिवेशन यशस्वी झाले आणि गाजले.

 त्यानंतर ह्याच शताब्दीच्या निमित्ताने प्राचार्य टोपे यांनी मुंबईला डॉ. सी. सुब्रमण्यम यांचे एक भाषण आयोजित केले आणि ह्या शताब्दी उत्सवाच्या समारोपाचे अधिवेशन १६ आणि १७ जानेवारी १९८८ रोजी पुण्यात झाले. (  १६ जानेवारीला न्या. रानड्यांची पुण्यतिथी असते.)त्याची जबाबदारीं 'केसरी'चे   तेव्हाचे संपादक श्री.शरदचंद्र गोखले यांनी घेतली होती. या अधिवेशनाचे उदघाटन श्रीमती गोदावरी परुळेकर यांनी केले. अधिवेशनाला श्री.नानासाहेब गोरे , श्री.गं.बा.सरदार, श्री.य.दि.फडके, डॉ .बाबा आढाव, आदी मंडळी उपस्थित होती. ऐनवेळी भाजप नेते डॉ. अरविंद लेले यांनी भाषण करण्याची परवानगी मागितली. त्यावरून बरेच वादंग झाले.

सामाजिक परिषदेची कायम पुनर्रचना करण्याचा काही प्रयत्न १९९२ मध्ये केला गेला. न्या. रानड्यांच्या १५० व्या जयंतीच्या ( १८ जानेवारी १९९२) निमित्ताने २९ जानेवारी १९९२ रोजी एका दिवसाची एक परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली.  डॉ. जयंत नारळीकर तिच्या अध्यक्षतेखाली होते.  परिषदेचे कायम अध्यक्ष म्हणून डॉ. मा. पं. मंगुडकर यांची निवड ह्या परिषदेत झाली.  परंतु त्यानंतर परिषदेचे काम बंद पडल्यासारखे झाले.     

माधवरावांनी हिरिरिने भाग घेऊन यशस्वी केलेला दुसरा उपक्रम म्हणजे जागतिक मराठी परिषदेची स्थापना आणि तिची पहिली दोन अधिवेशने. अशा परिषदेची कल्पना जुलै १९८५ मध्ये न्यूजर्सीत झालेल्या अमेरिकेतील मराठी भाषिकांच्या दुसऱ्या परिषदेत शिवसेना नेते  श्री.मनोहर जोशी यांनी प्रथम मांडली. ह्या परिषदेस श्री. शरद पवारही उपस्थित होते. पुढे फेब्रुवारी १९८९ मध्ये पवार यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली. तिला अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होती. ह्या बैठकीत 'जागतिक मराठी परिषद' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व पुढील पदाधिकारी निवडण्यात आले: अध्यक्ष श्री.शरद पवार; उपाध्यक्ष श्री.मनोहर जोशी; प्रा.के.ज.पुरोहित,श्री. ना.धों.महानोर; कार्याध्यक्ष श्री.माधव गडकरी; सरचिटणीस श्री.भा. कृ.देसाई.  

जागतिक मराठी परिषदेचे पहिले अधिवेशन मुंबईला षण्मुखानंद सभागृहात १२ आणि १३ ऑगस्ट १९८९ रोजी झाले. श्री.वि.वा. शिरवाडकर   उर्फ कवी कुसुमाग्रज त्याच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री श्री. शरद पवार परिषदेचे अध्यक्ष या नात्याने अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते, तर तेव्हाचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  श्री.पी.व्ही.नरसिंहराव  यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. ह्या अधिवेशनाचे वर्णन गडकरी यांनी 'अभूतपूर्व' असे केले आहे. आणि "असे अधिवेशन पुन्हा होणे नाही " असेही म्हटले आहे. पी.व्ही.नरसिंहराव  यांनी मराठीत उत्कृष्ट भाषण केले आणि श्री.शरद पवार यांचे भाषणही उत्तम झाले. कुसुमाग्रजांचे अध्यक्षीय  भाषण म्हणजे " विचार, भाषा आणि साहित्य याबाची मेजवानी होती" असा अभिप्राय माधवरावांनी दिला आहे. दोन दिवस षण्मुखानंद सभागृहात आणि नंतर आठवडाभर  नेहरू केंद्रात अनेक परिसंवाद आणि अन्य अनेक कार्यक्रम झाले. " ही जागतिक मराठी परिषद मराठी भाषेच्याच नव्हे तर मराठी संस्कृतीच्या इतिहासातील एक संस्मरणीय , रत्नाक्षरात नोंदविण्यासारखी घटना आहे" असे उदगार कुसुमाग्रजांनी काढले.           

जागतिक मराठी परिषदेचे दुसरे अधिवेशन  २६,२७,२८ एप्रिल १९९१ रोजी मॊरिशस मधील मोका या गावी झाले. त्याचे अध्यक्ष श्री. पु.ल.देशपांडे होते. त्यांनी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट भाषण केले. परिषदेचे अध्यक्ष या नात्याने श्री.शरद पवार आणि कार्याध्यक्ष या नात्याने माधवराव ही उपस्थित होतेच. मॊरिशसनंतर १९९४,१९९६ व १९९९ या वर्षांत जागतिक मराठी परिषदेची आणखी तीन अधिवेशने अनुक्रमे दिल्ली , जेरुसलेम (इस्त्रायल) आणि हैदराबाद येथे झाली. त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे डॉ.वसंत गोवारीकर, श्री.प्रभाकर देवधर आणि डॉ.रघुनाथ माशेलकर होते.

माधवरावांनी वेळोवेळी , विविध कारणांनी व निमित्तानी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यापैकी बहुतेक प्रवासांवर त्यांनी माहितीप्रद  आणि उदबोधक पुस्तके लिहिली.त्यातील काहींचा उल्लेख वर आला आहे. १९६५ मध्ये ते 'महाराष्ट्र टाइम्स ' मध्ये असताना त्यांना थॉमसन फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ब्रिटन ला गेले , तो त्यांचा पहिला परदेश दौरा.शिष्यवृत्तीचा काळ संपवून परत येताना ते युरोपमध्ये फिरले , त्याचप्रमाणे मॉस्कोलाही भेट देऊन आले. त्या सगळ्या अनुभवावरचे  त्यांचे 'मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन' हे पुस्तक १९६९ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाले.  १९८४ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली त्यानंतर 'गोमंतक' चे संपादक म्हणून गोव्यात असताना त्यांनी तीन परदेश दौरे केले.  जानेवारी १९७२ मध्ये बांगलादेशचा, १९७२ च्या उत्तरार्धात अमेरिकेचा आणि १९७५ मध्ये जपानचा.  जपानहून परत येताना ते हॉंगकॉंग आणि बँकॉकला  जाऊन आले.  या सर्वांबद्दलचा सविस्तर उल्लेख वर आला आहे.

नोव्हेंबर १९७६ मध्ये 'मुंबई सकाळची' सूत्रे हाती घेतल्यानंतर माधवरावांचे अनेक परदेश दौरे झाले.  त्यांनी म्हटल्याप्रमाणे, " ...मार्च १९८४ च्या कालावधीत आयर्लंड, अफगाणिस्तान, चीन आणि क्यूबा या चार देशांचे दौरे झाले आणि 'मुंबई सकाळ' मध्ये संप झाला तो मिटेना, तेव्हा ब्रिटन, आयर्लंड आणि युरोपातील पोर्तुगालपर्यंतचे देश मी हिंडून आलो ". ऑगस्ट १९७८ मध्ये अफगाणिस्तानच्या दौऱ्यात ते जलालाबाद येथे खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाहखान यांच्याकडे चार दिवस राहिले.  त्या अनुभवावर त्यांनी 'शेवटचे गांधी' हे पुस्तक लिहिले.  नंतर १९७९ मध्ये जनता सरकार असताना परराष्ट्रमंत्री  अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत माधवराव चीनला  गेले . त्यावर त्यांनी 'माओनंतरचा चीन' हे पुस्तक लिहिले.  त्यानंतर १९८३ मध्ये त्यांचा क्यूबा दौरा झाला.  त्याबद्दल त्यांनी 'क्रांतीनंतरचा क्युबा'हे पुस्तक लिहिले. 

एप्रिल १९८४ ते सप्टेंबर १९९२ पर्यंत माधवराव 'लोकसत्ता' चे संपादक होते, त्याकालावधीत अमेरिका दोनदा, जपान - दक्षिण कोरिया एकदा, सोव्हिएत युनियन एकदा, ब्रिटन तीनदा तर मस्कत ( ओमान ) एकदा असे परदेश दौरे केले.  यातील दोन अमेरिका दौरे १९८८ आणि १९८९ असे लागोपाठच्या वर्षात झाले.  १९८८ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी ते तेथे होते.  १९८९ च्या पूर्वार्धातला दुसरा अमेरिका दौराही महत्त्वाचा होता.  डेट्रॉईट येथे भरलेल्या अमेरिकेतील मराठी लोकांच्या परिषदेचे उद्घाटन माधवरावांच्या हस्ते झाले.  १९८९ च्या उत्तरार्धात ते मॉस्को, बर्लिन आणि लंडनला गेले.  त्यांच्या शब्दात "(या दौऱ्यात ) गोर्बोचेवची घसरण आणि येल्तसिनचा उदय पहिला ... बांधलेली बर्लिन भिंत १९६५ मध्ये पहिली होती.  या दौऱ्यात पाडलेली पहिली" . 'लोकसत्ता' मधून निवृत्त झाल्यावर ऑक्टोबर १९९२ मध्ये माधवरावांनी तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूलला भेट दिली.   

देश- विदेशात अखंड भ्रमंती हा माधवरावांचा आणखी एक स्वभावविशेषच होता.  त्यांनी सांगितले आहे की कविवर्य कुसुमाग्रजांनी जागतिक मराठी परिषदेत त्यांचा उल्लेख 'प्रवासी संपादक' असा केला होता.  त्यावर ते म्हणतात, " याचा अर्थ इतकाच की हस्तिदंती मनोऱ्यात बसून मी वृत्तपत्रकरिता केली नाही ... पुस्तके लिहावयाची आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशात पदरची भर घालून हे परदेश दौरे मी करीत आलो".  याव्यतिरिक्त देशांतर्गत भ्रमंती होतीच.

 माधवरावांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ३२-३३ भरते.  त्यातील अनेक त्यांच्या गोव्यातील, महाराष्ट्रातील आणि विविध देशातील भ्रमंतीतून निर्माण झाली ; त्यांचा उल्लेख वर आलाच आहे.  त्याशिवाय त्यांनी लिहिलेले 'प्रतिभासम्राट' हे राम गणेश गडकरी यांचे चरित्र, त्याचप्रमाणे 'कुसुमाग्रज - गौरव', 'साहित्यातील हिरे आणि मोती ','संयुक्त महाराष्ट्राचे महारथी' , 'चिरंतनाचे प्रवासी', 'गाजलेले अग्रलेख' , 'चौफेर' चे सहा खंड, 'दृष्टीक्षेप' चे चार खंड, यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. 

 'निर्धार' ते 'लोकसत्ता' हे माधवरावांचे महत्त्वाचे पुस्तक १९९३ मध्ये प्रसिद्ध झाले.  २००३ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली.  " पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझ्या जीवन प्रवासाचा ग्रंथ " असे त्यांचे वर्णन त्यांनी पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत केले आहे.  वस्तुतः ते त्यांचे आत्मचरित्रच आहे.  त्यांचे शेवटचे पुस्तक 'परिवर्तनाच्या उंबरठ्यावर' हे २००४ मध्ये प्रकाशित झाले.  त्याअगोदर १३ जून १९९७ या आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी माधवरावांचे  'अष्टपैलू आचार्य अत्रे'  हे पुस्तक प्रकाशित झाले.  २१ आणि २२ फेब्रुवारी १९९७ रोजी पुण्यात आकाशवाणीच्या पु.मं.लाड स्मृती व्याख्यानमालेत माधवरावांनी याच विषयावर दोन व्याख्याने दिली होती, ती या पुस्तकात काही सुधारणांसह त्यांनी ग्रथित केली.     

सततचे दौरे , विविध लोकपयोगी चळवळी , लेखन, संपादकपदाची जबाबदारी अशा व्यस्त कार्यक्रमातून गडकरींना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसायचा. १९९१ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील झाली. त्यामुळे त्यांच्या लेखनावर, चौफेर भ्रमंतीवर मर्यादा आल्या , तरी त्यांचे निवडक लेखन चालू होतेच. अखेरीस १ जून २००६ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी माधवरावांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेचे एक झळाळते युग लोप पावले.

'संपादक हा चेहेऱ्याने नव्हे तर लेखणीने ओळखला गेला पाहिजे', ही पारंपारिक विचारसरणी झुगारून देऊन संपादक त्याच्या लेखणीने तर ओळखला गेलाच पाहिजे , शिवाय या लेखणीमागील हाताने आणि तो हात ज्या चेहेऱ्याचा आहे त्या चेहेऱ्याने ओळखला गेला पाहिजे, अशी नवी विचारसरणी आत्मसात करून आणि आयुष्यभर तिच्याशी पूर्ण इमान राखून ज्या गडकरींनी पत्रकारितेचा धर्म पाळला ते गडकरी केवळ एक पत्रकार , संपादक, लेखक वा सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर ज्याला इंग्रजीत 'गडकरी स्कूल ऑफ जर्नालिझम म्हणता येईल त्या पाठशाळेचे कुलपतीही होते.


 

 


 
© www.madhavgadkari.com
Developed By Maitraee Graphics